प्रिय कैरीस...
लोणचं नसलं तर ते पान अपूर्णच राहील नै का..? त्यामुळे, डाव्या बाजूला लोणच्याची फोड बनून तुला आणि मला त्या खास पंगतीत विराजमान व्हायचंय. दरवर्षीप्रमाणे आपल्या स्वादिष्ट नात्याला पुन्हा एकदा मुरवायचंय… येतेस नं..??
तुझा,
#bedekar लोणच्याचा तयार मसाला.
प्रिय कैरीस,
पत्र तसंच तातडीचं असल्याने घाईघाईत लिहितोय. त्यामुळे प्रस्तावनेची लांबलचक फोडणी न घालता, आधी डायरेक्ट मुद्द्यावर येतोय. तर पहिला मुद्दा हा की, माझ्यासाठी वधूसंशोधनाला काही दिवसांपूर्वीच सुरुवात झालीय...आणि अर्थातच दुसरा मुद्दा हा की, तुला लवकरात लवकर इकडे येऊन थडकायला हवंय.
मुद्दा कळलाय नं? आता पुढे ऐक...
आंब्याच्या झाडावरच्या मोहराचा गंध कोकिळेला नंतर येत असेल...आमच्या घराला कोकिळेच्याही आधी येतो...खरंच सांगतोय...चेष्टा नाहीय ही...इतक्या वर्षांच्या अनुभवातून मला तसंच वाटतंय. तू आत्ता तिकडे झाडावर झुलत झुलत ‘कोकीळ कूजन’ वगैरे ऐकत असशील; पण आमच्या घरात ‘कैरी कूजन’ केव्हांच सुरु झालंय. आमच्या घराला सुगावा लागलाय.. तू आल्याचा…
दरवर्षी बाजारात कैऱ्या कधी येतायत, याचं संशोधन आमच्या घरात वधूसंशोधनासारखं उत्साहाने आणि उत्सुकतेने सुरु होतं! राजापुरी, तोतापुरी, लाडवा, मकाराम अशा अनेक जातपंथांच्या ‘यंदा कर्तव्य असणाऱ्या’ स्थळांची आंबटगोड चर्चा सुरु होते. आंबट, करकरीत, टिकावू, स्वादिष्ट अशा अनेक गुणधर्मांची यथेच्च छाननी झाल्यानंतर आपल्याला ‘राजपुरी’च बेष्ट...या वळणावर गाडी येऊन एक थांबा घेते.
“बाकीच्या फार किरकोळ असतात...राजापुरी कशी...मुळातच वजनदार...” असं म्हणून तिच्यासामोरची किरकोळ देहयष्टीची अनेक इच्छुक स्थळं मोडीत काढली जातात. जोरदार एलीमिनेशन राउंड होते...
इतक्यात, “राजापुरी हवी असली, तरी बलसाडकडचीच हवी हं”...असं म्हणून गाडी आता ‘जातीय’ वळणावरुन ‘प्रांतीय’ वळण घेऊ लागते …बलसाडकडच्या बागा आहेतच तशा जुन्या जाणत्या लोकांच्या....हे माहित असल्याने बलसाड राजापुरी वधूचं ‘घराणं’ही कसं चांगलंय यावर एक घरंदाज चर्चा होऊन तिच्या नावावर एकदाचं शिक्कामोर्तब होतं.
गुढ्या तोरणं उभारून चैत्र स्वागत होईलच आता इतक्यात.. पण तुझं स्वागत करण्यासाठी आमच्या घरात महिनाभर आधीच ‘दिवाण-ए-आम’ आणि ‘दिवाण-ए-खास’ सजू लागलेत.
घरात माहोल दिसू लागतो...ठेंगण्या-ठुसक्या, लहान-मोठ्या, बसक्या-उंच, चौकोनी-गोल, वाटोळ्या-सडपातळ अशा अनेक नावारुपांच्या काचेच्या बरण्या वऱ्हाडी बनून मांडवात येतात. त्या सगळ्या बरण्यांना धुवून पुसून, लखलखीत करून ‘दिवाण-ए-आम’ मधे एका प्रदर्शनात आणलं जातं. त्यातल्या काही हवाबंद, फिरकीच्या, नक्षीच्या ‘सुबक-ठेंगण्या’ उगीचच आपल्याकडे लक्ष वेधलं जावं अशा खटाटोपात चमकत असतात.
‘दिवाण-ए-खास’ची बातच निराळी... तिथे प्रदर्शन वगैरे मुद्दाच नसतो. तिथे चिनी मातीच्या खास वर्षभरासाठीच्या ठेवणीतल्या पारंपरिक बरण्या असतात. त्यांची जागाही विशिष्ट कपाटातल्या विशिष्ट खणात असते. त्यामुळे येरागबाळ्यांना ‘दिवाण-ए-खास’ पर्यंत जाताही येणार नाही याची पूर्ण दक्षता घेतलेली असते. मी अर्थातच, दिवाण-ए-खासच्या ‘खास’ काचेच्या कपाटातून या सर्वांवर लक्ष ठेऊन असतो.
ही झाली दरवर्षीची तयारी.. आता आज काय झालंय ऐक.. लगीनघाई सुरु झालीय. गेले चार दिवस, लग्नापूर्वीच्या मुहूर्ताच्या, हळदीच्या, संगीताच्या दिवसांसारखे गेलेत. उगाच इकडच्या तिकडच्या कैऱ्यांचं किसाचं लोणचं, टक्कू, मेथांबा, छुंदा, असे किरकोळ प्रकार करून झालेत. कैरीचं सार, आंबाडाळ, पन्हं असे नानाप्रकार करून सगळ्या आंबटशौकिनांनी आपापली एक दिवसाची हौस भागवून घेतलीय, पण ती तात्पुरती आहे. त्यामुळे आता मला दिसतंय... तुझी-माझी लग्नघटिका जवळ आलीय...म्हणून हा पत्रप्रपंच...
आज ‘तो’ दिवस आलाय. सगळी तयारी झालीय. फक्त तुझी प्रतीक्षा आहे. दरवर्षीप्रमाणे मी तुझी वाट बघतोय. तुझा हिरवागार रंग; रसरशीत रूप; आंबट-गोड स्वाद…. आणि त्या स्वाद-रुपाला लालभडक, झणझणीत अशी माझी लज्जतदार सोबत...काय कॉम्प्लिमेंट करतो आपण एकमेकांना...We are made for each other..
---तर सखे..आज लोणचं घालण्याचा मुहूर्त येऊन ठेपलाय. मी तुझी आतुरतेने वाट बघतोय…’मानाची पानं’ घेऊन झालीयेत. पण पंचपक्वान्नं जरी केली, तरी लोणचं नसलं तर ते पान अपूर्णच राहील नै का..? त्यामुळे, डाव्या बाजूला लोणच्याची फोड बनून तुला आणि मला त्या खास पंगतीत विराजमान व्हायचंय. दरवर्षीप्रमाणे आपल्या स्वादिष्ट नात्याला पुन्हा एकदा मुरवायचंय… येतेस नं..??
तुझा,
#bedekar लोणच्याचा तयार मसाला.
प्रत्येक घरच्या प्रत्येक कैरीला हे पत्र मिळावं असं आमच्या लोणचं मसाल्याला वाटतंय...लवकरात लवकर पोहोचवा बरं तिच्यापर्यंत!
तुमची,
~डॉ अपर्णा बेडेकर.
~४ एप्रिल,२०२१.