अ पोहा डे
पोहे खरंतर नाक्यानाक्यावर नाश्त्याच्या वेळी मिळणारा पदार्थ.... नाश्त्याची सोय एवढीच मार्केटव्हॅल्यू असलेला पदार्थ! खास कारणांसाठी आपण पोहे मागवत नाही… ' घर की मुर्गी दाल बराबर' या न्यायाने...
'पोहे' असं म्हंटल की महाबळेश्वरला घडलेला एक प्रसंग डोळ्यांसमोर उभा राहतो.… आम्ही सगळे हॉटेलात बसुन काय ऑर्डर करायची याची चर्चा करत बसलो होतो ; सहज म्हणून शेजारच्या टेबलवर नजर फिरवली तर दोन टेबलं व्यापून एक मोठं कुटुंब बसलं होत. भाषेवरून, पेहरावावरून ते उत्तर भारतीय कुटुंब असावं असं वाटत होत.त्यांनी काय ऑर्डर केलंय हे बघण्यासाठी त्यांच्या डिशेस वरून नजर फिरवली ( माहीत आहे हा शिष्टाचार नाही ....असं करू नये पण आपण बऱ्याच वेळा शेजारच्या टेबलवर काय बरं ऑर्डर केलंय हे बघतोच ) ... तर त्यांच्यापैकी अर्ध्यांनी मिसळ तर अर्ध्याजणांनी चक्क पोहे ऑर्डर केले होते आणि चवीचवीने सर्वजण त्यांचा आस्वाद घेत होते. बहुदा खास महाराष्ट्रीयन पदार्थ म्हणून त्यांना कोणीतरी मिसळ आणि पोहे सुचवले असावेत. 'चक्क पोहे ऑर्डर केले होते' असा मघाशी उल्लेख केला कारण मिसळ मागवतो आपण पण पोहे हा ' अति परिचायत अवज्ञा' झालेला पदार्थ! नेहमीच बनतो ना तो आपल्या घरी ; आता अस बघा.... जरा आठवून बघा आपण हॉटेलमध्ये गेलो की साधारणपणे काय मागवतो?...पंजाबी, दाक्षिणात्य, चायनीज, ब्रेडचे पदार्थ वगैरे. मराठमोळ्या हॉटेल मध्ये गेलो तर मिसळ, बटाटेवडे, कोथिंबीरवडी असं काहीतरी मागवतो. पोहे खरंतर नाक्यानाक्यावर नाश्त्याच्या वेळी मिळणारा पदार्थ.... नाश्त्याची सोय एवढीच मार्केटव्हॅल्यू असलेला पदार्थ! खास कारणांसाठी आपण पोहे मागवत नाही… ' घर की मुर्गी दाल बराबर' या न्यायाने...
तर असे हे पोहे मला स्वतःला प्रचंड आवडतात... २४ बाय ७ मी कधीही पोहे खाऊ शकते...नाश्त्याला, दुपारच्या जेवणाला, रात्रीच्या जेवणाला मी कधीही पोहे फस्त करू शकते.
हे पोहे बनवणं काय सोपं आहे असं कमी लेखून अजिबात चालत नाही; ते फक्कडच जमावे लागतात नाहीतर ते फसतात. साधा वरणभात देखील छानच जमावा लागतो नाहीतर नुसतच काहीतरी केलंय असं होत. आणि एखादा पदार्थ जेव्हा प्रचंड आवडतो तेव्हा स्वतःला तो खुप छान करताही येतो अशी माझी आपली एक श्रद्धा आहे.
या समिकरणाने मी अनेकवेळा फर्मास पोहे केले आहेत आणि ते फसण्याचे प्रमाण खूप कमी आहे... ही आत्मस्तुती मुळीच नाही कारण माझ्या 'चवण्या' नवऱ्यानं पोहे खाताना काहीही न बोलता फक्त खुणेनेच खुप छान अशी शाबासकी अनेकदा दिलीय यावरून काय ते समजा ( चवण्या म्हणजे पदार्थांची, चवीची अतिचिकित्सा करणारा ) असो थोडक्यात काय तर 'पोहे माहात्म्य' ज्याला उमजल त्यालाच ते पावतात ...
कृती अर्थातच साधी सोपी ... कांदे, बटाटे, टोमॅटो हे एकेकटे किंवा कॉम्बिनेशन कसेही घ्यावेत सोबत शेंगदाणे, मटार असतील तर अधिकच छान... हिरव्या मिरच्या कंपलसरीच.… कढीपत्ता नसेल तर काहीच मजा नाही तो हवाच … फोडणीला तेल कमी बिमी चालत नाही; भरपूर तेलाची खमंग फोडणी… पोहे देखील एक्झॅक्ट भिजावें लागतात कमी भिजले तर पोहे कोरडे होतात आणि जास्त भिजले तर गिच्च गोळा होतात. पोहे भिजवण्याचं सुद्धा एक 'शास्त्र' आहे; अनुभवाने ते जमतं. पोह्यात मग मीठ आणि कोणत्याही तिखट पदार्थात साखरेंने चव बॅलन्स होते म्हणून थोडीशी साखर… दोन- तीन दणदणीत वाफा आल्या की लिंबाचा रस .... हे असं सगळं साग्रसंगीत झालं की पोह्यांचा तो विशिष्ट सुगंध दरवळायला लागतो... बाहेरची माणसं आत डोकावयला लागतात. मग सोनेरी रंगाचे पोहे डिश मध्ये काढून त्यावर पांढऱ्याशुभ्र खोबऱ्याची आणि हिरव्यागार कोथंबीरीची पखरण करून ते सर्व्ह करावेत आणि सर्वांनी पुन्हा पुन्हा मागून ते खावेत, अहाहा नुसत्या वर्णनाने ज्यांच्या तोंडाला पाणी सुटलंय त्यांनी असा हा ' पोहा डे' वारंवार साजरा करावा.
हे असं पोह्यांविषयी इतक्या विस्ताराने लिहिण्याचं कारण की लॉकडाऊन मध्ये आलेला रेसिपीजचा पूर... समाज माध्यमावर पदार्थांच्या फोटोंचा, रेसिपीजचा,त्याच्या वर्णनाचा, सोबतच्या सेल्फीजचा नुसता कल्ला चालला होता … कधी डालगोना कॉफी तर कधी कुकर केक पोस्ट करून त्यावर लाइक्स मिळवले जात होते… म्हणूनच मी ठरवलं की आपल्या जिव्हाळ्याचा पदार्थ पोहे याविषयी काहीतरी लिहायचं. लॉकडाऊन मध्ये असे सगळेजण शेफ बनले कारण की पदार्थ बनवणं, त्याची तयारी करणं, एकत्र बसून त्याचा आस्वाद घेणं हे सगळंच अतिशय उत्साहवर्धक आहे, आनंददायक आहे … एक सुंदर विरंगुळा आहे. या पूर्णब्रह्माची साधना नैराश्य दूर करणारी आहे आणि पदार्थांची देवघेव मनामनातली दरी मिटवून टाकते. इतरांची खाद्यसंस्कृती आपण चटकन आपलीशी करतो. ठेपला, इडली-डोसा, छोले, सँडविच केव्हाच आपल्या स्वयंपाकघराचा एक भाग बनलेत. 'पोहे' इंदौरच्या खाऊगल्लीत मानाचे स्थान पटकावून आहेत. एकात्मता वाढवण्यासाठी, टिकवण्यासाठी अनेक प्रयत्न केले जातात. ' पाकसिद्धी' मुळे एकी पटकन साधली जाते कारण हृदयापर्यंत पोचण्याचा मार्ग पोटातून जातो असं म्हणतात. तेव्हा लॉकडाऊन नंतरही 'खात रहा.…खिलवत रहा!'
पद्मजा अमेय बापये
24 जानेवारी 1980
B.com
गृहिणी, आकाशवाणी मुंबई इथे निवेदिका म्हणून कार्यरत
वाचन, लेखन, स्वयंपाक, संगीत ऐकणे याची आवड
Mobile : 9869606061
Email padmaja.bapaye241@gmail.com