छान जमलंय 'मेतकूट'!! कोकणातले सगळेच पदार्थ कमीत कमी जिन्नस वापरून किंबहुना तिकडे जे काही उपलब्ध आहे, जे काही तिकडे पिकतं त्यातूनच बनणारे असतात..आणि मग तांदुळाचे पदार्थ किंवा भाताच्या प्रकारांची रेलचेल तर कोकणात असतेच असते.. कोकणात तर म्हणे घराघरात एक मऊ भाताचं पातेलं कायम चुलीवर रटरटत ठेवलेलंच असतं... असाच हा गुरगुट्या मऊभात किंवा आटवल हा बऱ्याच घरात अजूनही अगदी वारंवार होणारा पदार्थ आहे.. कधी पोटाला आराम म्हणून व कधी कधी घरातील गृहिणी ला ही आराम म्हणून, कधी हलका नाश्ता म्हणून, अगदी आजकाल पोटभर ब्रन्च म्हणून सुद्धा मऊभात-मेतकूट-तूप आणि बरोबर लोणचं / दही / पापड असं आवडीने खाणारे आमच्या सारखे काही लोक आहेतच… मऊभात म्हंटलं की त्याबरोबर मेतकूट / वेसवार आणि मस्त साजूक तूप हे सगळं हवंच..ह्या मेतकूटाची लहानपणी आजोळी ओळख झाली आणि मग ती गट्टी अगदी काही वर्ष परदेशी होते तेव्हाही आणि आज ही मुलाला पटकन भातावर वरण / आमटी नाहीये मग मेतकूट तूप कालवून देते इथपर्यंत छान जमली आहे. माझं आजोळ म्हणजे गिरगावातले बेडेकर , मूळ कोकणातले आणि मग लोणची मसाले ह्यां साठी मुंबईत नावारूपाला आलेले व्ही.पी. बेडेकर. कोकणातून येणारे निरनिराळे तांदुळाचे प्रकार, त्याचा केलेला गुरगुट्या भात, त्यावर घरीच बनवलेलं मेतकूट आणि मस्त साजूक तुपाची धार असा 'हेल्दी भी - टेस्टी भी' नाश्ता आई-आजी कायम करायच्या. शाळेच्या सुट्ट्यांच्या दिवसात तर आजोळी जेव्हा सगळी भावंडं जमायचो तेव्हा तर "एकदा गुरगुट्या भात जेवली मुलं, की दिवस भर भूक-भूक करणार नाहीत.." असं वाक्य आई-मावशी-मामी ह्यांच्या गप्पां मध्ये असायचंच.. सुट्टीत सकाळी उशिरा अंथरुणातून उठेपर्यंत हा असा नाश्ता तयारच असायचा आणि घरभर मऊ भाताचा वास दरवळत राहायचा.. आम्हा मुलांना मऊ भात तर आवडायचाच पण त्याबरोबर काहीतरी मस्त चटपटीत पण हवंय असं टुमणं ही आम्ही लावलेलं असायचं..मग कधी भाजलेला किंवा तळलेला पोहा / उडीद पापड, अधे मधे चुरचुरीत कांद्याची-बटाट्याची भजी किंवा अगदीच काही नाहीतर पातळ पोह्यांचा खमंग चिवडा असं काही भाताबरोबर तोंडी लावणं लगेच मिळत असे. साधंच पिवळं धम्मक दिसणारं हे मेतकूट म्हणजे एक 'पॉवर पॅक' जिन्नस आहे असं वाटतं कधी कधी..मिश्रं डाळी आणि काही मसाल्याचे पदार्थ एकत्र भाजून दळलेलं हे मेतकूट स्वयंपाकघरात पटकन मदतीला येतं.. हे मेतकूट, भाताबरोबर खायला तर झालंच पण पटकन कधी दह्यात कालवून तर कधी मुळ्या सारख्या उग्र वासाच्या कोशिंबिरीत घालून जेवणातली डावी बाजू मस्त चविष्ट करायला ही कामी येतं. मला माझ्या सासरी आल्यावर तर मेतकूट वापरून मस्त ‘लावलेले पोहे’ पण करता येतात हे कळलं..आणि नवऱ्याला ऑफिस मधून आल्यावर चटकन खूष करायचा झटपट मार्ग सापडला.. लावलेले पोहे म्हणजे साधे कच्चे पातळ पोहे घ्यायचे, त्यात थोडं मेतकूट, लाल तिखट, मीठ आणि थोडं कच्च तेल असं घालून कालवायचे आणि पाच मिनिटात गट्टम करायचे.. परदेशी असताना, भारतातून जाताना किंवा कोणाबरोबर पार्सल पाठवलं तरी आई आवर्जून एक तरी मेतकूटाचं पाकीट (अर्थात बेडेकर चं..) द्यायची. अगदी गरोदरपणात सुद्धा ऑफिस हून आल्यावर पटकन भात करायचा आणि मग मेतकूट घालून खायचा आणि आराम करायचा हा मार्ग ह्या मेतकूटामुळे मी काढला होता..आज सुद्धा ह्या लॉकडाऊन च्या दिवसात एक तर सकाळीच मस्त मऊभात-मेतकूट खायचं किंवा दिवसभर छान वेगवेगळे पदार्थ खाऊन रात्री पोटाला आराम म्हणून मेतकूट भात खायचा असा रिवाज झाला होता.. आजोळी भावंडांबरोबर किती ही भांडलो तरी जसं क्षणात परत एकत्र येऊन मेतकूट जमायचं तसंच हे स्वयंपाकातील मेतकूट घरोघरी विविध पदार्थांबरोबर जमत राहो ही सदिच्छा !! माझं हे मेतकूट पुराण कसं वाटलं मला नक्की सांगा..
सौ. मधुरा भूषण लेले
पुणे
Ph - ९८१९५०२८३५
Email - madhura.joshi2382@gmail.com